जवाहर चौक ते रानतळे रस्त्याच्या कामावेळी नळपाणीपुरवठयाची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

न . प. प्रशासनाविरोधात नागरिकांतुन संताप

राजापूर l प्रतिनिधी : एकीकडे पाणी बचतीचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे मात्र राजापूर नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. राजापुरातील जवाहर चौक ते रानतळे या रस्त्याचे काम करताना रस्त्यावरील पाणीपुरवठा वाहिन्यांचे योग्य काम करणे आवश्यक असताना ते न केल्याने काम करताना पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. नागरिकांतुन याबाबत संताप व्यक्त् होत आहे.

राजापूर न. प. कडून जवाहर चौक ते रानतळे रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या कामाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे. या भागातील नागरिकांनी वारंवार सूचना देऊनही नगरपरिषदेने नळ पाण्याची पाईपलाईन न बदलल्यामुळे रस्त्याचे काम सुरू करतात सदर पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. जवाहर चौक ते रान तळे रस्ताचे काम मंगळवार सुरू करण्यात आले परंतु काही मिनिटातच पाईपलाईन फुटल्याने सदर काम थांबले आहे. सदर बाबत नगरपरिषदेला नागरिकांनी वारंवार कळवूनही त्यावर नगरपरिषद ने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे आज रस्त्याचे काम थांबले आहे. सदर पाईपलाईन ही सिमेंटची असून रस्त्यापासून अर्धा फूटही खोल नाही त्यातच रस्त्याचे काम चालू झाल्यावर त्यावर व्हायब्रेटर फिरवण्यात येणार असून सदर पाईपलाईन अधिक फुटण्याची शक्यता आहे.त्यामुळे नगर परिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष दयावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.