दापोली | प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त दापोली येथे महिलांसाठी मोफत गर्भाशय मुख कर्करोग तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे आणि कर्करोगाचे लवकर निदान व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने तसेच रत्नागिरी येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महिलांसाठी गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील निदानात्मक एचपीव्ही (HPV) चाचणी मोफत करण्यात येणार आहे. यासोबतच महिलांना गर्भाशय मुख कर्करोगाविषयी मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येणार आहे.
हे शिबिर ८ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तहसीलदार कार्यालय, दापोली येथे आयोजित करण्यात आले आहे. महिलांनी वेळेत तपासणी करून आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.













