ग्रामपंचायत स्तरावर मुलांना हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी बालसभेची स्थापना 

सावंतवाडी । प्रतिनिधी : गाव पातळीवर ६ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना असणाऱ्या समस्या, त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा व मार्गदर्शन याविषयीच्या मागण्या ग्रामपंचायत स्तरावर मांडण्यासाठी तसेच समूह-ग्रामसंघ-प्रभागसंघ रचना समजण्यासाठी मुलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने तळवडे येथे बालसभेची स्थापना करण्यात आली. उमेद अभियान अंतर्गत PRI-CBO अभिसरण प्रकल्प सावंतवाडी तालुक्यातील अनमोल प्रभागसंघ तळवडे अंतर्गत समृद्धी ग्रामसंघ व तिरंगा ग्रामसंघ अंतर्गत बालसभा स्थापन करण्यात आली. तर समृद्धी ग्रामसंघ यांची सिद्धेश्वर बालसभा तसेच तिरंगा ग्रामसंघ यांची शिवबा ग्रामसभा या नावाने बालसभा सुरू करण्यात आली.

यावेळी तळवडे सरपंच वनिता मेस्त्री, पोलीस निरीक्षक श्रीमती मुळीक, पोलीस पाटील मयुरी राऊळ, समृद्धी ग्रामसंघ सचिव प्रिया परब, तिरंगा ग्रामसंघ अध्यक्ष पल्लवी मेस्त्री, तालुका व्यवस्थापक स्वाती रेडकर, तसेच प्रभाग समन्वयक सचिन नाईक, मेंटोर श्रीमती गिरीजा, बीआरपी प्राची राऊळ, एलआर पी मयुरी दळवी, अंगणवाडी सेविका, सर्व सी आर पी व सदस्य बाल सभेसाठी उपस्थित होते.

दोन्ही ग्रामसंघातून बाल सभेसाठी अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, सहसचिव, आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. ही बालसभा महिन्यातून एक शनिवार संध्याकाळी ३ वाजता या वेळेत घेतली जाईल असे ठरवण्यात आले. तसेच या बाल सभेसाठी ग्रामसंघ मधील एक पदाधिकारी, सीआरपीताई तसेच एलआरपीताई उपस्थित राहतील असे ठरवण्यात आले. अशाप्रकारे शिवजयंतीच्या निमित्ताने समृद्धी ग्रामसंघाची सिद्धेश्वर बालसभा व तिरंगा ग्रामसंघाची शिवबा बालसभा स्थापन करण्यात आली. तसेच मोबाईल चे दुष्परिणाम मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.