नेमळे गावात तलाठी नसल्याने शेतकरी त्रस्त

सावंतवाडी । प्रतिनिधी : नेमळे गावातील शेतकरी गेल्या तीन-चार महिन्यांपासून कायमस्वरूपी तलाठी नसल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत. महसुली गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेमळे गावात तलाठी नसल्याने शेतकऱ्यांची अनेक महत्त्वाची कामे खोळंबली आहेत.

यापूर्वी नेमळे गावासाठी पाटोळे तलाठी कामकाज पाहत होते, परंतु त्यांची बदली तळवडे येथे झाल्याने नेमळे गावासाठी निरवडे येथील तलाठी सोमवार आणि बुधवार असे दोन दिवस काम पाहत होते. मात्र, सध्या तेही तलाठी रजेवर असल्यामुळे शेतकऱ्यांची सातबारा उताऱ्याशी संबंधित अनेक कामे थांबली आहेत. त्यामुळे शासकीय योजना आणि बँक कर्जासाठीची प्रकरणे रखडली आहेत.

तसेच २०२५ – २६ च्या खरीप हंगामातील पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत १४ ऑगस्ट असताना, पीक पाहणी ॲप बंद असल्याने शेतकऱ्यांची भात पिकाची नोंदणी होऊ शकत नाहीये. यामुळे शेतकरी शासनाच्या विविध लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

नेमळे येथील शेतकऱ्यांनी सावंतवाडी तहसीलदारांना या समस्येची तात्काळ दखल घेण्याची विनंती केली आहे. नेमळे गावासाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी तलाठ्याची नेमणूक करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.