जमावबंदी आदेश मोडून उरूस साजरा केल्याप्रकरणी राजापुरात ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल

जमावबंदी आदेश मोडून उरूस साजरा केल्याप्रकरणी राजापुरात ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल

उपविभागिय अधिकारी यशवंत केडगे यांची माहिती

राजापूर प्रतिनिधी शहरात मच्छीमार्केट लगत असलेल्या वास्तुत उरूस साजरा करण्यासाठी मागण्यात आलेली परवानगी जमावबंदी आदेश असल्याने राजापूर पोलीसांनी नाकारलेली असतानाही जमावबंदी आदेश जुगारून या ठिकाणी बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी उरूस साजरा केल्या प्रकरणी राजापूर पोलीसांनी ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी पत्रकारांना दिली आहे.
या प्रकरणी परवनागीसाठी ज्यांनी अर्ज केला होता ते अल्ताफ कासम बारगीर रा. बाजारेपठ राजापूर, त्यांचे सहकारी मन्सुर काझी, सुलतान ठाकुर रा. राजापूर यांसह सुमारे ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे केडगे यांनी सांगितले. या प्रकरणी राजापूर पोलीस स्थानकातील पोलीस शिपाई अनिल लक्ष्मण केसकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापुरातील मच्छीमार्केट लगत असलेली ऐतिहासिक वास्तु हे पुरातन सुर्य मंदिर असल्याचे नमुद करत या ठिकाणी मुस्लीम समाजातील काही व्यक्तींनी अतिक्रमण केले असून ते १९ फेब्रुवारी रोजी या ठिकाणी उरूस कार्यक्रम करणार आहेत त्याला प्रतिबंद करावा अशी मागणी हिंदू समाजाच्या वतीने एका लेखी निवेदनाद्वारे बुधवारी राजापूर पोलीसांकडे करण्यात आली होती.
दरम्यान अल्ताफ कासम बारगीर या ठिकाणी उरूस साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र प्रशासनाकडून आदेश क्र. उचिशा/पोल-२ मनाई आदेश २०२५ दिनांक १५/०२/२०२५ अन्वये दिनांक १६/०२/२०२५ रोजी ००.०१ वा. ते दिनांक ०२/०३/२०२५ रोजी २४.०० वा चे मुदतीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेला असल्याने आपणाला उरूस साजरा करण्यास परवानगी देता येणार नाही असे नमुद करत राजापूर पोलीसांनी बारगिर यांना उरूस साजरा करण्यास परवानगी नाकारली होती. व तसे लेखी पत्र दिले होते असेही केडगे यांनी सांगितले.
मात्र पोलीसांनी परवानगी नाकारलेली असतानाही व जमावबंदी आदेश असतानाही संबधितांकडून् या ठिकाणी उरूस साजरा करण्यात आला व जेवणही ठेवण्यात आले होते. मा. अप्पर जिल्हा दंडाधिकारी सो रत्नागिरी यांचेकडील मनाई आदेश प्राप्त झालेला असल्याने कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात आलेली होती व तसे त्यांना राजापूर पोलीस ठाणे जा.क्र.१०६०/२०२५ दिनांक १९/०२/२०२५ अन्वये लेखी समजपत्र देण्यात आले होते. मात्र तरीही अल्ताफ कासम बारगीर व त्यांचे सहकारी मन्सुर काझी, सुलतान ठाकुर व अन्य ५० ते ६० जणांनी या आदेशाचा भंग करून उरूस साजरा केला असे केसरकर यांच्या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या फिर्यादीवरून राजापूर पोलीसांनी बारगिर व त्यांच्या सहकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये दिलेल्या मनाई आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन माझी त्यांचेविरुध्द भा.न्या.सं. कलम २२३.३ (५) व म.पो.का. कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचे केडगे यांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास करत असल्याचेही केडगे यांनी सांगितले.
हिंदु समाज बांधवांनीही केली होती कारवाईची मागणी
दरम्यान या ठिकाणी उरुस साजरा करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी केलेली असतानाही करण्यासाठी व पोलिसानी परवानगी नाकारलेली असतानाही प्रशासनाच्या आदेशाला न जूमानता चिंचबाध येथे उरुस साजरा करण्यात आल्याने गुरूवारी हिंदू समाज बांधवांच्या वतीने राजापूर पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
यावेळी उरूस साजरा करून त्याचे व्हिडिओ संबधितांकडून सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आल्याची माहिती देत ते व्हिडिओही पोलीसांना देण्यात आले.
यावेळी महेश मयेकर,अभिजित गुरव, सुरज पेडणेकर, विनोद गादीकर, विवेक गुरव, मोहन घुमे, संदेश टिळेकर, संदीप चव्हाण, सुयोगा जठार, माधवी हर्डीकर, शीतल पटेल आदींसह हिंदू समाज बांधव उपस्थित होते. यांनी उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे व पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्याकडे या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.