रत्नागिरी : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाच्या अलीकडे उतारात वळणावर शुक्रवारी सकाळी 7.30 वा. सुमारास ट्रकवरील ताबा सूटल्यामुुळे झालेल्या अपघातात चालक आणि क्लिनर या दोघांचा जागिच मृत्यू झाला.
चालक मोहम्मद अत्तार समशेर अली शहा (22,रा.नागनाथपूर पकरपूर सुलतानपूर उत्तरप्रदेश) आणि क्लिनर गुलाम मोहम्मद रज्जाक अली शहा (21,रा.इब्रदीमपूर प्रमापगढ,उत्तरप्रदेश) अशी अपघातामधील दोन मृतांची नावे आहे. शुक्रवारी सकाळी चालक मोहम्मद अली शहा हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-04-एचडी-8292) मधून लोखंडी सळ्या भरुन गोवा ते मुंबईच्या दिशेने जात होता. सकाळी 7.30 वा. सुमारास त्यांचा ट्रक बावनदी पुलाच्या अलीकडील उतारातील वळणात आला असता चालकाचा तेथील उतारात ट्रकवरील ताबा सूटल्यामुळे हा अपघात झाला. हा अपघात इतका भिषण होता त्यामुळे ट्रकच्या केबीनचा चेंदामेंदा झाला. दरम्यान,अपघाताची माहिती तेथील पोलिस पाटील संजना पवार (41,रा. निवळी कोकजे वठार ) यांनी ग्रामीण पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा करुन दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवले. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल चव्हाण करत आहेत.












