बेर्डेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला गळती 

 

कालव्यातील पाणी झिरपून ग्रामस्थांच्या भातशेतीत साचले, मोठे नुकसान

संतोष कोत्रे lलांजा () तालुक्यातील वेरवली येथील बेर्डेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला गळती लागली असून या कालव्यातून झिरपणारे पाणी नजीक असणार्या शेतकऱ्यांच्या भातशेतीच्या जमिनीत घुसून मशागतीसाठी एकत्र ठेवलेले सर्व साहित्य भिजून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .

याप्रकरणी वेरवली गुरववाडी येथील ग्रामस्थांनी वेरवली सरपंच तसेच लांजा तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे. यात म्हटले आहे की, वेरवली बुद्रुक येथील बेर्डेवाडी धरण प्रकल्पाचा डावा कालवा ओपन असून उजवा कालवा हा बंदिस्त आहे. परंतु डाव्या कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी हे चार किलोमीटरच्या पुढे जात नाही. ठिकठिकाणी कालव्याला लागलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी झिरपून ते आमच्या गुरववाडीतील शेतकऱ्यांच्या शेतीत घुसत आहे .डाव्या कालव्यातून झिरपणारे पाणी हे आमच्या भात शेतीमध्ये साटल्यामुळे मशागतीसाठी एकत्र करून ठेवलेले सर्व साहित्य पूर्णपणे भिजून गेले आहे. परिणामी आम्ही या वर्षीची शेतीची मशागत देखील करू शकत नाही.

तसेच सध्याचा पाणीसाठा बघता पावसाळी हंगामात सुद्धा आम्ही यावर्षी भातशेती करु शकत नाही.परिणामी आम्हाला यावर्षी नको त्या मानवनिर्मित संकटाला सामोरे जावे लागणार असून त्यामुळे आमचे यावर्षी सामूहिक चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान होणार आहे .त्यामुळे आम्हाला संबंधित खात्याकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील ग्रामस्थ दीपक गुरव, अशोक गुरव, शांताराम गुरव ,रघुनाथ गुरव आदींनी केली आहे.