सिंधुदुर्गातील पाच ठिकाणी राबविले ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान..

संत निरंकारी मंडळाचा उपक्रम..

वेंगुर्ले l दाजी नाईक :‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन विश्वभरात केले गेले. या अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोबा मंदिर तळी, आरवली, वेंगुर्ले ब्रमहेश्वर तळी, बांबुळी, कुडाळ. गणपती साना कणकवली शहर कणकवली, महादेव मंदिर तळी, नाधवडे वैभववाडी तसेच देवगड समुद्र किनारा, देवगड अश्या पाच ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली ज्यामध्ये सुमारे ६५० पेक्षा जास्त निरंकारी सेवादल स्वयंसेवक व भाविक भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला.

परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या आशीर्वादाने ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत हे अभियान राबविण्यात आले. संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण प्रभारी श्री.जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की देशभरात राबविलेल्या ‘अमृत प्रोजेक्ट’ परियोजनेच्या दरम्यान सर्व सुरक्षा मानकांचे पूर्णपणे पालन करण्यात आले.

संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने, पूज्य बाबा हरदेवसिंहजी यांच्या असंख्य दिव्य शिकवणूकींतून प्रेरणा घेत या पावन अभियानाचे आयोजन करण्यात आले. पूर्वीप्रमाणेच याही वर्षी ‘चला सावरु, यमुना किनारे’ असा उद्घोष करत या अभियानाला आणखी व्यापक स्वरूप देण्यात आले. २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील १६५० पेक्षा अधिक ठिकाणी १० लाखांहून अधिक संख्येने सेवाभावनेने ओतप्रोत स्वयंसेवक भक्तगणांनी एकाच वेळी हे महान अभियान साकारले. अशी माहिती संत निरंकारी मंडळ सिंधुदुर्ग चे मिडिया सहाय्यक अजिंक्य मुसळे यांनी दिली.