त्या महिलेचा खून कर्जबाजारीपणातून..? | आरोपीची कबुली

सिंधुदुर्ग : ओसरगाव येथील जळालेल्या स्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख पटली. हा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे, वरची वाडी येथील चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या सौ. सुचिता सुभाष सोपटे (वय ५९) हिचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

 

सदर महिलेला ठार मारून आणि जाळून टाकणारा संशयीत आरोपीच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांना यश आले आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून आज शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आंबोली बेळगाव मार्गावरून गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले असून तो वेंगुर्ले तालुक्यातील असल्याचे पुढे आले आहे. कर्ज बाजारी असल्यानेच त्याने या महिलेचा गोड बोलून काटा काढला असून पहिल्यांदा गाडीतील टाॅमीने डोक्यावर घाव घालून मारले आणि तिला ओसरगाव येथे पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. ही महिला 23 फेब्रुवारीपासून घरातून कोल्हापूर येथे डाॅक्टरकडे जाते म्हणून निघून गेली होती. त्यानंतर तिचा मोबाईल लागत नव्हता. घरातील दागिने ही घेऊन गेली होती. त्यामुळे घरच्यांनी पोलिसात बेपत्ताची तक्रार दिली होती. पोलिसांनी बेपत्ता तक्रारी वरून महिलेचे शेवटचे लोकेशन कुठे दिसते तसेच महिला कुठून कुठे गेली याचाच तपास सुरू केल्यानंतर ओसरगाव येथील घटनेतील महिला ही किनळे येथील असल्याचे पुढे आले. महिलेची मुलगी मुंबईवरून गुरूवारी कणकवली येथे दाखल झाली. तिने ही दागिन्यावरून आईचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पोलिसांनी यातील संशयित आरोपी वर लक्ष केंद्रित केले तेव्हा वेंगुर्ले येथील एका व्यक्तीचा या महिलेशी सतत संपर्क दिसून येत होता.   त्यावरून पोलिसांनी गुरूवारी रात्रीच या संशयित आरोपीला बेळगावच्या दिशेने जात असतनाच ताब्यात घेतले. त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यावरून ही महिला किनळे येथील अंगणवाडीसेविका असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या गुन्ह्य़ातील आरोपीला अटक करण्यात पोलिसाना यश आले असून ही हत्या आरोपीने कर्जबाजारीपणातून केली असून या महिलेचे दागिने विकण्यासाठी तो बेळगाव येथे जात असतनाच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासात प्रकरणाचा छडा लावल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.