हर्षा ऑटोचा उपक्रम
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये हाय सिक्युरिटी (उच्च सुरक्षा) नंबर प्लेटविषयी जनजागृती करण्यासाठी हर्षा ऑटोजतर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाळ माने, सहाय्यक प्रादेशिक परिवाहन अधिकारी अजित ताम्हणकर, मोटर वाहन निरीक्षक प्रशांत जाधव, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सुशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात हाय सिक्युरीटी नंबर प्लेट वितरणाची जबाबदारी हर्षा ऑटोजकडे आहे आणि म्हणून जास्तीत जास्त वाहनचालकांपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लवकरात लवकर पोहोचण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात केंद्र उभारण्यात येईल, असे या वेळी हर्षा ऑटोचे मिलिंद सावंत यांनी सांगितले.
मोटर वाहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रसंगी हाय सिक्युरिटी नंबरप्लेट का महत्वाची आहे, हे सर्वांना विविध उदाहरणे देऊन समजावले. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या प्रत्येक गाडी मालकाने वेळेत ही नंबर प्लेट लावावी, असे आवाहन केले.
माजी आमदार बाळासाहेब माने यांनी देखील मनोगत व्यक्त केले. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट मागील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संकल्पना उपस्थितांना सांगितली. तसेच रस्ता सुरक्षेकडे मोटर वाहन विभागाने लक्ष द्यावे, असे देखील सुचवले. याप्रसंगी १० जणांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे वितरण करण्यात आले. पेट्रोल डीलर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय लोध यांनी संगमेश्वरमधील धामणी पेट्रोल पंप येथे यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला रत्नागिरी शहरातील बहुसंख्य नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.











