बांदा | प्रतिनिधी : इन्सुली धुरीवाडी येथे महिलेशी अश्लील वर्तन व तिच्या पतीला मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. संबंधित महिलेच्या फिर्यादीनुसार संशयीत विरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा बांदा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. रॉबर्ट विल्सन फर्नांडिस (३२, रा. निगुडे तेलीवाडी)असे संशयिताचे नाव आहे. बांदा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त झालेली माहिती अशी की, इन्सुली धुरीवाडी येथे मगर पॉईंट आहे. सदर मगर पॉईंट कडे जाण्यासाठी संबंधित जमीन मालकांची परवानगी घ्यावी असा फलक जमीन मालकांनी लावलेला आहे. शुक्रवारी दुपारी संशयीत रॉबर्ट फर्नांडिस हा मोटरसायकल वरून मगर पॉईंटकडे पर्यटक घेऊन आला व फिर्यादीच्या लहान मुलीच्या अंगावर मोटरसायकल घालून तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला. कोणाचीही परवानगी न घेता तो मगर पॉईंटला गेला. याबाबत फिर्यादीचा दिर यांनी विचारणा केली असता त्याने दादागिरीची भाषा केली. तसेच फिर्यादीशी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तो दारूच्या नशेत होता.
सदर संशयित रॉबर्ट फर्नांडिस हा शनिवारी दुपारी पुन्हा मगर पॉईंट जवळ आला व फिर्यादी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करू लागला. फिर्यादी महिले बरोबर त्याची झटापट झाली. यावेळी तिच्या हातातील बांगड्याही फुटल्या. यावेळी तिचा नवरा विचारणा करण्यासाठी आला असता त्याला थापटाने मारहाण केली. संशयीत हा चारचाकी गाडी घेऊन आला होता. त्याच्या समवेत अन्य दोघेजण होते.
शनिवारी सायंकाळी महिलेने रॉबर्ट विरोधात बांदा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार बांदा पोलिसात विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत










