शेतकरी देसाई यांचे लाखो रुपयांचे नुकसान
दोडामार्ग : प्रतिनिधी
कळणे – सडा येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास काजू बागायतीतील शेत मांगराला अज्ञाताने हेतुपुरस्सर आग लावल्याची घटना घडली. या दुर्घटनेत लक्ष्मण देसाई यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलीस स्थानकात अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
याबाबत स्थानिकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सध्या या परिसरात जमीन खरेदी – विक्री प्रकरणातील दलालांचा सुळसुळाट आहे. दलाल मंडळी जमीन हेरून ती परप्रांतीयांना विकत आहेत. जमीन सर्व्हे करायला सोपे जावे यासाठी या भागात आग लावण्याचे प्रकार सुरू आहेत. आपला मांगरही अशाच कुणीतरी अज्ञात दलालाने पेटवून दिला आहे असा संशय लक्ष्मण देसाई यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी कळणे-भिकेकोनाळ सरपंच अजित देसाई, शेतकरी संघटना अध्यक्ष श्री. देसाई, तसेच दोडामार्ग पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मांगर जाळून नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांनी शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. याबाबत दोडामार्ग पोलीस स्टेशनला अज्ञाता विरोधात फिर्याद दाखल केली आहे.











