एलटीटी-मडगाव स्पेशलसह सीएसएमटी-मडगावला ‘रिग्रेट’

जरा जादा होळी स्पेशल गाड्यांकडे

खेड(प्रतिनिधी) शिमगोत्सवासाठी कोकण मार्गावर मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी- मडगावसह एलटीटी-मडगाव होळी स्पेशल जाहीर करत प्रतीक्षा यादीवरील चाकरमान्यांना दिलासा दिलेला असताना १३ मार्च रोजी धावणाऱ्या सीएसएमटी मुंबई- मडगावसह एलटीटी-मडगाव स्पेशलना मात्र ‘रिग्रेट’ मिळाला आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या नजरा जादा होळी स्पेशल गाड्यांकडे खिळल्या आहेत.

शिमगोत्सवात ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते. यंदा शिमगोत्सवातील नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल होताच चाकरमान्यांच्या नजरा होळी स्पेशल गाड्यांकडे खिळल्या आठवडाभरापूर्वीच म. रे. प्रशासनाने सीएसएमटी-मडगावसह एलटीटी- मडगाव स्पेशलच्या ८ फेऱ्या जाहीर केल्या. २४ पासून आरक्षण खुले होताच अवघ्या काही मिनिटातच आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने चाकरमान्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे.

०११५१/०११५२ क्रमांकाची एलटीटी-मडगाव स्पेशल ६ व १३ मार्च रोजी धावणार असून ४ फेऱ्यांचा समावेश आहे. १३ मार्च रोजी धावणाऱ्या एलटीटी-मडगाव स्पेशलच्या फेऱ्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. या पाठोपाठच ०११२९/०११३० क्र.ची एलटीटी- मडगाव स्पेशल १३ व २० मार्च तर परतीच्या प्रवासात १४ व २१ मार्च रोजी धावणार आहे. स्पेशलच्याही १३ मार्च रोजी धावणाऱ्या फेरीचे आरक्षण फुल्ल होऊन ‘रिग्रेट’ मिळाला आहे.

१३ मार्चपासून शिमगोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. होळीच्या दिवशीच धावणाऱ्या दोन्ही स्पेशल गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने होळीच्या दिवशी गाव गाठायचे कसे, याची चिंता चाकरमान्यांना सतावत आहे. रेल्वे प्रशासनाने जादा होळी स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केल्यास शिमगोत्सवात गावी येण्याचे नियोजन करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या नजरा आता जादा होळी स्पेशल गाड्यांकडे रोखल्या आहेत.