वेरळ येथील घटना, एकावर गुन्हा दाखल
लांजा (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून गाभण गाईला वेदना होतील अशा उद्देशाने काठीने पाठीवर तसेच बरगड्यांवर मारहाण करून दुखापत केल्याची घटना वेरळ येथे घडली असून याप्रकरणी लांजा पोलिसांनी येथील एकावर गुन्हा दाखल केला आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद सुरेश सखाराम पातेरे (वय ५२, राहणार वेरळ पातेरेगाव) यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. सुरेश पातेरे हे दिनांक २ मार्च रोजी नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता आपल्या घरातील गुरांना चरवण्यासाठी वेरळ घाटातील प्रीतम धाब्याच्यामागे घेऊन गेले होते. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास गुरे चरत असताना येथील प्रीतम धाब्याच्या समोरील बाजूच्या आवारात गेली. त्यावेळी फिर्यादी सुरेश पातेरे यांच्या एका गाभण गाईचे शिंग येथील प्रीतम धाब्याच्या इलेक्ट्रिक शोच्या तोरणाला अडकून सदर तोरणाची वायर तुटली. या किरकोळ कारणातून या प्रीतम धाब्याचे मालक प्रभाकर बाबू जाधव (वय ५० वर्षे, राहणार वेरळ बौद्धवाडी )यांनी पातेरे यांच्या गायीचा कोणताही विचार न करता पाळीव गाभण गाईला वेदना होईल या उद्देशाने काठीने पाठीवर व बरगड्यांवर मारून तीला दुखापत केली .
याप्रकरणी सुरेश पातेरे यांनी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी प्रभाकर जाधव यांच्यावर प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे हे करत आहेत.










