खेड(प्रतिनिधी)
वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या वर्दळीने दिवस-रात्र गजबजणाऱ्या खेड-भोस्ते रेल्वेस्थानक मार्गावर अखेर ‘पॅच’चा मुलामा देत मार्ग सुस्थितीत आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे काहीअंशी वाहनचालकांना दिलासा मिळाला असला तरी या पॅचमुळे मार्ग कितपत सुस्थितीत राहिल याबाबत शंका उपस्थित करण्यात आले आहे.
ग्रामसडक योजनेंतर्गत या मार्गावर कोट्यवधी रूपयांचा चुराडा करण्यात आला होता. मात्र दर्जाहीन कामामुळे मार्गाची दैनावस्था झाली होती. पावसाळ्यात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे
वाहनचालकांना विशेषतः रिक्षा व्यावसायिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता. अपघाताचे प्रमाणही मोठ्याप्रमाणात वाढले होते. मात्र रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे रिक्षा व्यावसायिकही मेटाकुटीस आले होते.
मार्गाच्या दुरूस्तीसाठी प्रशासनावर सातत्याने झालेल्या टीकेनंतर अखेर मार्ग सुस्थितीत आणण्यास सवड मिळाली. गेल्या ४-५ दिवसांपासून मार्गावर ‘पॅच’ मारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या पॅचमुळे मार्ग कितपत सुस्थितीत राहिल, याबाबत सांशकता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्यातरी वाहनचालकांची कसरत थांबल्याने काहीअंशी दिलासा मिळाला आहे.









