राजापूर (वार्ताहर): येथील राजापूर अर्बन बँकेच्या नूतन अध्यक्षपदी संजय ओगले तर उपाध्यक्षपदी विजय पाध्ये यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामध्ये बँकेचे अध्यक्षपद भूषविण्याचा श्री. ओगले आणि उपाध्यक्षपद भूषविण्याचा श्री. पाध्ये यांना दुसऱ्यांदा बहुमान मिळाला आहे.
राजापूर अर्बन बँकेवर सर्वपक्षिय सहकार पॅनेलचे वर्चस्व असून सहकार पॅनेलकडून पाच वर्षासाठी सर्वपक्षीय संचालकांना अध्यक्ष व उपाध्यक्षपदी संधी देता यावी यासाठी एक धोरण निश्चित करून अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला होता. त्याप्रमाणे सहकार पॅनेलकडून अनामिका जाधव यांना अध्यक्षपदासाठी तर, उपाध्यक्षपदासाठी विवेक गादीकर यांना संधी देण्यात आली होती. या दोघांनीही आपली मुदत संपल्याने आपापल्या पदांचे राजीनामे दिले होते. संचालक मंडळाच्या बैठकीत ते मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी सहकार विभागाकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर, रिक्त झालेल्या बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अविनाश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली.
बँकेच्या संचालक मंडळावर वर्चस्व असलेल्या सत्ताधारी सर्वपक्षीय सहकार पॅनेलमध्ये यापूर्वी अध्यक्षपदासाठी श्री. ओगले, तर, उपाध्यक्षपदासाठी श्री. पाध्ये यांची नावे निश्चित करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे अध्यक्ष म्हणून श्री ओगले, तर, उपाध्यक्षपदी श्री. पाध्ये यांची बिनविरोध निवड झाली. सर्वांना सोबत घेवून बँकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. ओगले यांनी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केला.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी अध्यक्षा सौ. जाधव, माजी उपाध्यक्ष श्री. गादीकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ, मुख्यकार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे आणि अधिकारी-कर्मचारीवृंद, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दिपक नागले, शहरप्रमुख सौरभ खडपे, नगर वाचनालयाचे अध्यक्ष प्रभात पाध्ये, प्रसन्न मालपेकर, दादा बिर्जे, अॅड. महेश नकाशे, माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारीवृंद, हितचिंतक, सभासद आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.












