राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने १६ मार्च रोजी राजापूरात ‘पालखी महोत्सव’ चे आयोजन

शिमगोत्सवात रंगणार अनोखा पालखी सोहळा

राजापूर (वार्ताहर): कोकणच्या लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा असलेल्या शिमगोत्सवाची धामधुम अवघ्या कोकणात सुरू झाली आहे. अबालांपासून वृध्दांना निखळ आनंद मिळवून देणारा हा सण कोकणच्या जनमाणसाचा आगळा अविष्कारच म्हणावा लागेल. अशा या शिमगोत्सवाचे पारंपारिक सादरीकरण एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधी राजापूर प्रतिष्ठान तर्फे ‘पालखी महोत्सव २०२५’ च्या माध्यमातून राजापूर वासियांना उपलब्ध झाली आहे.

रविवार दि. १६ मार्च रोजी राजापूर शहरातील गुजराळी यशोदिन सृष्टी येथे हा पालखी महोत्सव भरत आहे. या महोत्सवात ग्रामदेवतांच्या पालख्या देवदेवतांसह, आपल्या पारपारिक खेळे, ढोल ताशांसह सहभागी होवून शिमगोत्सवातील पारंपारिक नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. गावागावात साजरा होणारा हा उत्सव आता राजापूर शहरात एकाच व्यासपीठावर अनुभवता येणार आहे. कला, क्रीडा, सांस्कृतीक परंपरांचे जतन आणि सर्वधनाच्या हेतुन स्थापन झालेल्या राजापूर प्रतिष्ठानने हा आगळा उपक्रम हाती घेतला आहे.

शिमगा हा कोकणचा सणच नाही तर तो उत्सव आहे. या सणाला कित्येक पिढयांची परंपरा लाभली आहे. परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरूण पिढीला आपल्या रूढी परंपरा सण यांचा विसर पडू लागला आहे. अशावेळी निखळ आनंद मिळवून देणाऱ्या आपल्या परंपरागत संस्कृतीची ओळख व त्याची जाण नव्या पिढीला व्हावी तसेच काळाच्या प्रवाहात लुप्त होवू पाहणाऱ्या कोकणातील संस्कृती आणि कलेचे जतन व्हावे या उद्देशाने या पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे यांनी सांगितले.

दिवसभर हा सोहळा रंगणार आहे. सहभागी झालेल्या गावांच्या ग्रामदेवतांच्या पालख्या निर्धारीत वेळेत पालखीनृत्य, टीपरीनृत्य, ढोल नृत्य यांचे सादरीकरण करणार आहेत. यातील सहभागी ग्रामदैवतांचा यथायोग्य मान सन्मान राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने केला जाणार आहे. तर जाणकार परिक्षकांमार्फत परिक्षण देखील केले जाणार आहे. कोकणी मातील असली लोककलांचा अविष्कार यातून कोकणच्या लोकसंस्कृतीचे विलोभनीय दर्शन एकाच व्यासपीठावर या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.

या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे यांच्या नेतृत्वाखाली नंदकुमार पुजारे, अशफाक मापारी, प्रकाश कातकर, गोपाळ गोंडाळ, सुधीर विचारे, राजू कार्शिंगकर, सुभाष नवाळे, संदीप पवार, प्रकाश पुजारे आदी मंडळी परिश्रम घेत आहेत.

यातून कोकणच्या लोकसंस्कृतीचा जागर व्हावा, नव्या पिढीमध्ये याविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा असा प्रामाणिक हेतू असून तरूण पिढीसह अबाल वृध्दांनी या सोहळयाला उपस्थीत राहून आनंद घ्यावा असे आवाहन राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.