राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडून रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

राजापूर (वार्ताहर): राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राजापूर यांनी आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून निसर्ग संवर्धन आणि हरित पर्यावरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. संस्थेच्या संचालक मंडळ आणि कर्मचारीवृंद यांच्या हस्ते नुकतेच धारतळे आणि शर्लिन मोंटा ओणि परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
पतसंस्थेच्या या स्तुत्य उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने राजापूर येथील निसर्गप्रेमी धनंजय मराठे यांनी उपस्थितांना झाडांचे संवर्धन आणि संगोपन कसे करावे, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, या कार्यक्रमासाठी अमोल सिनकर यांचेही सहकार्य लाभले. संस्थेच्या सचिव सौ. अमरे यांनी श्री. मराठे आणि श्री. सिनकर यांचे आभार मानले.
यावेळी संस्थेच्या माजी संचालिका सौ. प्रेमिला पटेल यांनी शर्लिन मोन्टा ओणि येथिल आपल्या जागेत वृक्षारोपणासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले. संस्थेच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाला सर्व संचालक, सर्व कर्मचारीवर्ग आणि पिग्मी एजंट यांची उपस्थिती लाभली.
पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल आणि भविष्यात परिसरातील हरित क्षेत्रात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.