अंदाजे ६५ फूट लांबी – मिरवणुकीनंतर होळी उभी करण्यास वाजले मध्यरात्रीचे दोन 

साळ गडे उत्सवासाठी होळीचा बोर्डे – डिचोली ला मान 

दोडामार्ग :सुहास देसाई :साळ येथील प्रसिद्ध गडेत्सवातील होळी डिचोली तालुक्यातील बोर्डे येथील सुनील कमलाकांत पळ आणि कुटुंबीयांनी श्री चरणी अर्पण केली. होळी दिवशी साळ येथून गडे मंडळ, देवस्थान समिती, ग्रामस्थ आणि भाविकांकडून आपापल्या वाहनाने २१ किलोमीटरचा प्रवास करून बोर्ड येथील ” घोंड्या ” जमीन क्षेत्रातील बागायतीतील कोकम झाडाची होळी सदाशिव गाडगीळ यांच्या पौरोहित्याखाली विधिवत पूजा करण्यात आली. सुरुवातीला ज्येष्ठ गडा मधुकर परब तद्नंतर श्री चरणी होळी अर्पण केलेल्या सुनील पळ व पंचायतनातील हनुमान घाडी यांच्या हस्ते पूजन झाले तर नंतर अनुमान घाटडी व सहकाऱ्यांनी हे झाड होळी म्हणून तोडण्यात आले .

बागायतीत दाटीवाटीत असलेल्या ६५ फूट लांब अशी ही होळी खडतर प्रयत्नाने बाहेर काढण्यात आली तसेच बाहेर काढण्यासाठी जेसीबीचाही वापर करण्यात आला त्यानंतर तिला ट्रक वर चढवून सुस्थितीत बांधून ढोल तमाशाच्या गजरात मिरवणुकीने साळला नेण्यात आले. ही होळी बोर्डे डिचोली, मुळगाव , अस्नोडा , नानोडा, कासारपाल, वडावल मार्गे साळला सीमेपर्यंत पोहोचली . होळीचा प्रवास सुरू असताना ठीक ठिकाणी सुहासिनीनी खणा नारळाने ओटी भरून तिचे स्वागत केले. संध्याकाळी ७.०० वाजता श्री महादेव मंदिराच्या प्रांगणात पोहोचली.

च्यारी कुटुंबीयांच्या हस्ते होळीचे ओबड ढोबड अंग तासले हे काम पूर्ण होण्यास मध्यरात्रीचे बारा वाजले , नंतर तिला आंब्याच्या डहाळ्या बांधून सुशोभित केले त्यात मुख्यत्वे तळकटकर ( शेटकर ) भाविकांनी सहभाग घेतला तर नंतर गडे सदस्य, महाजन ,ग्रामस्थ आणि भाविकांनी तरफांचा आधार देत रात्री एक वाजता होळी उभी करण्यास सुरुवात केली , मध्यरात्री दोनच्या सुमारास ही होळी न्यॅमात उभी केली होळी उभी करतेवेळी व होळी उभी करताना बघण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले होते. होळी उभी करताना व उभी होत असताना तीन चार वेळा देव-देवचाराने मशाल पेटवून दर्शन देत आपला आनंद व्यक्त केला व हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी या मशालीचे दर्शनी घेतले , हे दर्शन डोळे दिपवणारे होते . खुशी- खुशीत सर्व भाविक आपापल्या घरी परतले त्यानंतर गडा सदस्य जनार्दन राऊत यांच्या हस्ते पुरोहित सदाशिव गाडगीळ यांच्या करवी विधीवत पूजा करून अल्पशी अग्नी पेटवली .

आज पहिली रात्र असून रविवार १६पर्यंत हा गडेत्सव संपन्न होणार असून भाविकांची मोठी गर्दी उसळणार अशी अपेक्षा ठेवून विविध प्रकारची दुकाने कार्यक्रम ठिकाणी दाखल झाली आहेत त्यांना योग्य जागा देण्यात देवस्थान समितीतर्फे यंदा युवकांनी सहभाग दाखवला असे देवस्थान अध्यक्ष कालिदास राऊत व सचिव विशाल परब सांगून हेसुद्धा उपस्थित राहून सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत . सांज वेळेला उभ्या केलेल्या होळीला झेंडूच्या फुलमाळांनी भाविक व ग्रामस्थांनी सजवले व येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी येथील प्रत्येक कुटुंब भोजनाच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.