किल्ले विशाळगडावरून लांजा येथे रविवारी १६ मार्च रोजी शिवज्योत आणणार 

छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मोत्सव दिन सोहळा समितीचे आयोजन 

संतोष कोत्रे l    लांजा -: पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उद्या रविवारी १६ मार्च रोजी किल्ले विशाळगडावरून लांजा येथे रविवारी १६ मार्च रोजी शिवज्योत आणली जावून रॅली काढण्यात येणार आहे.

छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मोत्सव दिन सोहळा समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे किल्ले विशाळगड ते श्रीराम मंदिर लांजा येथे शिवज्योत घेऊन येणार आहेत त्याचप्रमाणे रविवारी १६ मार्च रोजी बाईक रॅली काढून शिवज्योत लांजा मधील विविध ठिकाणी दर्शनासाठी घेऊन जाणार आहेत. दि. १७ मार्च २०२५ रोजी फाल्गुन कृष्ण तृतीया रोजी तिथीप्रमाणे महाराजांची सकाळी ९ ते ११ विधिवत पूजा करून जन्मोत्सव व पाळणा, प्रसाद त्यानंतर सायंकाळी ६:३० वाजता पारंपारिक वाद्य,मर्दानी खेळ अशा मंगलमय वातावरणात पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे,

शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक साटवली रोड लांजा या ठिकाणी होणाऱ्या या सर्व कार्यामध्ये लांजा तालुक्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना,पक्ष, स्थानिक स्तरावरील सर्व हिंदू बांधवांनी आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मोत्सव दिन सोहळा समिती, लांजा यांच्या वतीने करण्यात आले आहे.