रत्नागिरी : फिनोलेक्स अकॅडेमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलॉजीमध्ये अंतर्गत तक्रार समितीच्यावतीने दिनांक ७ मार्च २०२५ रोजी “महिलांसाठी स्वसंरक्षण” या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला राम कर यांना विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना मार्शल आर्ट्समधील मूलभूत प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे डीन फॅकल्टी डॉ. एस.बी. कुलकर्णी यांनी श्री. राम कर आणि टीमचे स्वागत केले. कु. गायत्री सुवरे यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला. आयसीसीच्या संयोजक प्रा. डॉ. शारदा चौगुले यांनी शैक्षणिक संस्थेत अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याची आवश्यकता सांगितली. तसेच गरज पडल्यास महिला स्वतःचा बचाव करू शकेल अशा सत्राची आवश्यकता त्यांनी उपस्थितांना स्पष्ट केली. राम कर यांनी समाजात अशा घटनांना तोंड देत असलेल्या महिला आणि मुलींसाठी स्वसंरक्षणाची गरज यावर चर्चा केली आणि हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी मुली/महिलांनी घ्यावयाच्या विविध पावले यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. श्री. राम कर आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मार्शल आर्ट्सच्या मूलभूत प्रशिक्षणाबद्दल विविध प्रात्यक्षिके प्रत्यक्षात दाखवली.
आयसीसीच्या सचिव प्रा. वृंदा कुलकर्णी यांनी मान्यवरांचे आभार मानले. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन शाखेच्या कु.गायत्री सुवारे आणि कु. अनुष्का घाणेकर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष मेहनत घेतली. या सत्रासाठी महाविद्यालयातील सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.












