अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. शेखर निकम यांनी महत्त्वांच्या विषयांकडे शासनाचे लक्ष वेधले

मुंबई:– अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी गृह विभाग, जलसंपदा, पर्यटन व पर्यावरण या विभागांवर महत्वपूर्ण महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तर उपस्थित केलेले प्रश्न तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.

 

हिवाळी अधिवेशनाबरोबरच अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील आमदार शेखर निकम यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडून ते प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. आता देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक विषयांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. यामध्ये चिपळूण तालुक्यातील सावर्डे या ठिकाणी असलेल्या पोलीस स्टेशनकरीता अद्यावत सोयीसुविधांनी युक्त इमारतीची उभारणी करणे. चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीपासून होणाऱ्या पूर हानी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पास शासनाकडून मंजूरी देण्यात यावी. वाशिष्ठी नदी पात्रातील खाजगी जमीन शासनाने खरेदी करून नदी पात्रातील गाळ काढावा. चिपळूण शहरासाठी आखलेली ब्ल्यु लाईन, रेड लाईनचे पुन:सर्वेक्षण करावे. कोकणातील तेलेवाडी व उमरे धरण लवकरात लवकर दुरुस्त करून ते नागरिकांसाठी उपलबद्ध करावे. संगमेश्वर तालुक्यातील गडगडी लघु प्रकल्पांतर्गत कालव्यांसाठी बंदिस्त पाईप लाईन धोरण आखणे. कोकणातील पर्यटन वाढीचा विचार करताना त्यासाठी आवश्यक रस्ते, पुल, विज कनेक्शन, कमर्शियल वीज मीटर कनेक्शन प्रश्न, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग व इतर पायाभुत सुविधा यांचा प्राधान्याने विचार करणेत यावा, असे आ. निकम यांनी यावेळी नमूद केले.

 

ते आणखी पुढे म्हणाले की, कोकणातील नमन, खेळे, जाखडी, बाल्या नृत्य, दशावतार, शंकासूर या लोककलांना शासकीय सन्मान देण्यात यावा. कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी या करीता कोकण पर्यटन महामंडळ स्थापन करून ग्रामीण पर्यटन व कृषी पर्यटन यांना चालना द्यावी. कोकणातील फॅक्टरींचे पाणी नद्यांना सोडल्याने नदी प्रदूषीत होत असल्याने त्यावर कडक शासकीय धोरण निश्चित करावे, असे प्रश्न उपस्थित करून तातडीने हे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.