शिबिरात २६६ रुग्णांनी घेतला लाभ
संतोष कोत्रे l लांजा -: कोणताही स्वार्थ वा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला शैक्षणिक, आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात या एकमेव उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था काम करत आहे. त्यामुळे सर्वच लोकांनी या संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांना भरभरून पाठिंबा दिला पाहिजे, असे प्रतिपादन लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी गवाणे येथे केले
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय झडपोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिर 21 मार्च रोजी गवाणे येथे पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गवाणे गावचे सरपंच भिमराज कांबळे, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र लांजा तालुकाप्रमुख योगेश संतोष पांचाळ,गवाणे गावचे पोलीस पाटील रवींद्र कोटकर व अवधूत रामाणे, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद करंबेळे, संतोष रेवाळे सामाजिक कार्यकर्ते, राकेश कदम, नितीन घुमे आदी उपस्थित होते.
या शिबिराचा २६६ रुग्णांनी लाभ घेतला.
शिबिरामध्ये निलेश भगवान सांबरे यांच्या माध्यमातून सर्व रुग्णांना मोफत चष्मे वाटप तसेच हृदयरोग तपासणी करता इसीजी डोळे तपासणी व मोफत औषध वाटप करण्यात आले.याशिवाय विविध आजरांच्या यामध्ये मुळव्याध, अपेंडिक्स, किडनी स्टोन, एंजॉग्रफी, एन्जोप्लास्टी याशिवाय स्त्री रोगासाठी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया (ऑपरेशन) संपूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. हे शिबीर आयोजित केल्या बद्दल गवाणे गावातील रुग्णांनी निलेश सांबरे यांचे मनापासून आभार मानले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी योगेश पांचाळ, जिल्हाध्यक्ष महेंद्र मांडवकर, केदार चव्हाण
सचिव जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच. जिजाऊ संस्थेची आरोग्य टीम आणि गावातील ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.












