रत्नागिरी l प्रतिनिधी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दिनांक 23 मार्च रोजी लांजा आणि राजापूर तालुक्यात ज्येष्ठांसाठी आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक पर्यटन सहलीला ज्येष्ठ नागरिकांबरोबरच ज्येष्ठ महिलांनी बहुसंख्येने सहभागी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहलीचे नेटके नियोजन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम आणि प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रभाकर कासेकर यांनी करून ज्येष्ठांचा आनंद द्विगुणित केला. कडक उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन आरामदायी वातानुकूलित बसेसची व्यवस्था केल्याने ज्येष्ठांचा प्रवास सुखावह झाला.
लांजा तालुक्यातील आंजणारी नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरात वसलेल्या श्री दत्त मंदिरात दर्शन घेऊन सहलीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध गंगातीर्थ स्थानाला भेट देऊन गंगेचे दर्शन घेतले. राजापूर मधील श्री धूतपापेश्वर मंदिराचे नूतनीकरण आणि परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. तेथील श्री धूतपापेश्वराच्या दर्शनानंतर आडीवरे येथील श्री महाकाली मंदिराला भेट देण्यात आली. त्यानंतर भारतातील प्रसिद्ध सूर्य मंदिर समजल्या जाणाऱ्या आणि लाकडी कोरीव कामाचा अप्रतिम नमुना असलेल्या कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिराला भेट देऊन देवस्थानचा प्राचीन इतिहास जाणून घेण्यात आला.
कशेळी येथील सागर किनाऱ्यावरील नव्याने पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत असलेल्या सनसेट पॉईंटवर जाऊन ज्येष्ठ नागरिकांनी पर्यटनाचा आनंद घेतला. परतीच्या प्रवासात पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर आणि गोळप येथील श्री गजानन मंदिरात दर्शन घेतले. दुपारी कशेळी येथील भक्त निवासात ज्येष्ठांची भोजन आणि दुपारच्या विश्रांतीची व्यवस्था देवस्थान समितीने करून सहकार्य केल्याबद्दल वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.












