…… अन्यथा २८ मार्च पासून करणार आंदोलन 

डीएड, बीएड कंत्राटी शिक्षक संघटनेचा (रत्नागिरी जिल्हा) इशारा 

 संतोष कोत्रे l      लांजा -: वेतन न झाल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे .त्यामुळे २७ मार्च पर्यंत सर्व कंत्राटी शिक्षकांचे वेतन न झाल्यास दिनांक २८ मार्चपासून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा रत्नागिरी जिल्हा डीएड, बीएड कंत्राटी शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे .

डीएड, बीएड कंत्राटी शिक्षक संघटना रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने याबाबतचे निवेदन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील विविध प्राथमिक शाळांमध्ये ४९१ शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.यामध्ये १०९ शिक्षकांच्या नियुक्ती या १४ ऑक्टोबर २०२४ रोजी तर ३८६ शिक्षकांच्या नियुक्त्या या ७ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आलेल्या आहेत .

या सर्व कंत्राटी शिक्षकांचे वेतन अद्यापही करण्यात आलेले नाही. आणि यामुळेच आम्हा सर्व शिक्षकांवर आणि कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. आमची ही व्यथा लक्षात घेऊन २७ मार्चपर्यंत हे शिक्षकाचे वेतन करण्यात यावे, अन्यथा नाईलाजास्तव २८ मार्चपासून आपल्या कार्यालयासमोर सर्व कंत्राटी शिक्षक आंदोलन करणार आहेत. तरी याबाबतची दखल घेऊन आमच्यावर आंदोलनाची वेळ आणू नये अशी विनंती या निवेदनाद्वारे या कंत्राटी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.