खेड (प्रतिनिधी) कोकण मार्गावरून धावणाऱ्या सीएसएमटी मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेसमधून मुंबईतून गोव्यातील थिवीम रेल्वेस्थानकापर्यंत विनातिकीट प्रवास करणाऱ्या तिघांवर रेल्वे पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या तिघांनीही मद्यप्राशन करत गैरवर्तन केल्याचेही तपासात उघड झाले आहे.
हे तिघेजण कोकणकन्या एक्स्प्रेसमधून विनातिकीट प्रवास करत असल्याची बाब समजताच तिघाही प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे तिकिटाबाबत विचारणा केल्यानंतर प्रवासाचे तिकीट नसल्याचे आढळून आले. या कारणास्तव त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, सध्या कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांतून फुकट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.












