खेड (प्रतिनिधी) खेड नगर परिषदेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात शहरातील १ ते २५ प्रभागात थकित मालमत्ता करधारक व पाणीपट्टी करधारक यांच्यावरील कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. कराची मालमत्ता रक्कम भरण्यास कुचराई करणाऱ्या १४ जणांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत १२० थकितदारांचा प्राणीपुरवठाही खंडित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली.
येथील नगर परिषदेने जानेवारी महिन्यातच थकित पाणीपट्टीधारकांविरोधात कारवाईची मोहीम सुरू करत ८० हून अधिकजणांचा पाणीपुरवठा खंडित केला होता.. थकित पाणीपट्टीधारकांनी कराची रक्कम भरणा केल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. या कारवाईचा थकितदारांनी धसका घेत स्वतःहून नगर परिषद कार्यालय काढत रक्कम भरणा करणे पसंत केले होते. यानंतर नगर प्रशासनाने कारवाई तूर्तास थांबवली होती. मार्च महिन्यात मुख्याधिकारी रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकाची नेमणूक करत थकित पाणीपट्टीधारकांसह मालमत्ता जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. वसुली पथकात नागेश बोंडले, गंगाधर गायकवाड, उमेश रेपाळ, राजेंद्र तांबे, संदेश मोहिते, परशुराम पाथरे, सुरज शिगवण, आकाश जाधव, सुरज उपावले आदींचा समावेश आहे.












