भोस्ते घाटात कंटेनरला दोन मोटारसायकलींची धडक एक ठार, एक जखमी

खेड | प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गावरील  भोस्ते घाटातील रस्त्याच्या बाजुला उभ्या करून ठेवलेल्या कंटेनरला पाठीमागून दोन मोटारसायकलस्वारांनी धडक दिल्याने एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यु झाला आहे. तर दुसरा मोटारसायकलस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात २२ मार्च २०२४ रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास घडला.
दिनेश बाळाराम चिनकटे (३५, रा. हेदली चिनकटेवाडी, ता. खेड) असे मृत्युमुखी पडलेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे तर कृष्णा शंकर भोसले (४९, रा.खेर्डी ,ता. चिपळूण) असे गंभीर जखमी झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. या अपघाताची खबर पोलीस हवालदार विरेंद्र शांताराम आंबेडे यांनी दिली असून पोलीसांनी मयत व जखमी झालेल्या दोन्ही मोटारसायकलस्वारांविरोधात भा. दं. वि. सं. कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र परशुराम निसाद (३२, रा. चिले ,न्हावाशेवा, ता. पनवेल, जि. रायगड, मूळ  रा. बुद्धपुर, सराय, मोहद्दिनपुर, शहानवाज , जोनपूर, राज्य उत्तरप्रदेश) याने त्याच्या ताब्यातील कंटेनर (क्रमांक एम. एच.४३-बी. एक्स. ०७०७) मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात चढ़ावामध्ये गोवा दिशेकडे तोंड करून रस्त्याच्या डाव्या बाजुला बंद स्थितीत उभा करुन ठेवलेला असताना मोटारसायकल (क्रमांक- एम. एच. ०८- ए. व्ही. ८९९६) वरील चालक दिनेश बाळाराम चिनकटे व स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एम. एच. ०८-एस. ९५२७) वरील चालक कृष्णा शंकर भोसले यांनी हयगयीने मोटारसायकल चालवून बंद स्थितीत असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडक देऊन अपघात केला आहे. गंभीर दुखापतीमुळे स्वतःच्या मुत्यूस कारणीभूत झालेल्या मयत मोटारसायकलस्वार दिनेश बाळाराम  चिनकटे आणि डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या जखमी मोटारसायकलस्वार कृष्णा शंकर भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.