गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार
त्या वृध्दाच्या डोक्याला गंभीर जखम : हाताची बोटेही तुटली
वैभववाडी l प्रतिनिधी : वयोवृद्धाला जबर मारहाण करत अज्ञात चोरटा सोनसाखळी हिसकावून पसार झाला आहे. नापणे धनगरवाडा येथे ही घटना घडली आहे. या घटनेने तालुका हादरला आहे. वयोवृद्ध पुरुषोत्तम नरहरी प्रभूलकर हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. तसेच दोन्ही हाताची बोटे तुटली आहेत. जखमी प्रभूलकर यांना उपचारासाठी कणकवली येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात च्या सुमारास घडली. घटनेची माहिती पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पीएसआय माधुरी अडुळकर, उद्भव साबळे, हरीश जायभाय, अभिजित तावडे घटनास्थळी दाखल झाले.
जखमी पुरुषोत्तम प्रभुलकर वय ८१ मुळगाव भुईबावडा हे पत्नी समवेत नापणे धनगरवाडी येथे राहत होते. त्यांची मुले व्यवसायानिमित्त मुंबईला राहतात. सोमवारी त्यांच्या घरासमोर एक अनोळखी इसम आला. त्याने त्यांच्याकडे पाणी मागितले. प्रभुलकर यांनी दरवाजा न उघडताच खिडकीतून त्याला पाण्याची बॉटल दिली. तो इसम पाणी पिऊन माघारी गेला. मंगळवारी सकाळी प्रभुलकर हे बाहेर अंगणात गेले असता त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने अचानक हल्ला केला. लाकडी दांडक्याचा जोरदार प्रहार त्याने प्रभुलकर यांच्या डोक्यात केला. त्यांनी डोक्यावर दोन्ही हात घेताच दांडक्याचा फटका बोटांवर बसला. त्यात त्यांची दोन्ही हाताची बोटे निकामी झाली आहेत. चोरटा तेवढ्यावरच न थांबता त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली. दरम्यान प्रभुलकर यांची पत्नी घरातून बाहेर येत जोरजोरात ओरडली. त्यानंतर तो चोरटा बाहेर पळाला. बाहेर उभी करून ठेवलेल्या मोटरसायकल वरून त्याने धूम ठोकली. प्रभुलकर यांनी ही माहिती स्थानिक रिक्षा चालकांना दिली. त्यानंतर नापणे गावातील स्थानिक नागरिक यांनी प्रभुलकर यांच्या घरी धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळतात पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला. वयोवृद्ध प्रभुलकर यांना जखमी अवस्थेत वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पोलीस व नागरिकांनी हलविले. पुढील उपचारासाठी त्यांना कणकवली येथे हलविण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण वैभवाडी तालुका हादरून गेला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल करत आहेत.











