मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने मिळून मुंबई ते मडगाव दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
गाडी क्रमांक ०११०४/०११०३: मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी सुरु होणार आहे.
* गाडी क्रमांक ०११०४: मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ६ एप्रिल ते ४ मे पर्यंत दर रविवारी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव जंक्शनहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
* गाडी क्रमांक ०११०३: लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ७ एप्रिल ते ५ मे पर्यंत दर सोमवारी सकाळी ८.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि रात्री ९.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
थांबे: या रेल्वेगाडीला करमळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबा असेल.
डब्यांची रचना: या रेल्वेगाडीत एकूण २० एलएचबी डबे असतील, ज्यामध्ये द्वितीय श्रेणी वातानुकूलित (१ डबा), तृतीय श्रेणी वातानुकूलित (३ डबे), शयनयान (८ डबे), सामान्य (४ डबे), तृतीय श्रेणी इकॉनॉमी (२ डबे), जनरेटर कार (१ डबा) आणि एसएलआर (१ डबा) यांचा समावेश असेल.
या दोन नवीन हंगामी गाड्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाणाऱ्यांसाठी ही विशेष रेल्वेसेवा नक्कीच सोयीस्कर ठरेल.












