सावंतवाडी । प्रतिनिधी : शिरशिंगे गावात गवारेड्याने हल्ला केल्याने राणेवाडीतील स्वप्निल सुनील सावंत नामक तरुण जखमी झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता शिरशिंगे जलमदेव परिसरात घडली. दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
स्वप्निल सावंत हा वेर्ले येथून आपल्या दुचाकीवरून शिरशिंगे येथे आपल्या घरी परतत होता. याच दरम्यान, अचानक एक गवा रेडा रस्त्यावर आला आणि त्याने समोरून येणाऱ्या स्वप्निलच्या दुचाकीवर हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यात दुचाकीवरून खाली पडल्याने झालेल्या अपघातात स्वप्निलच्या पायाला मुका मार लागला, ज्यामुळे त्याला दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच गावातील स्थानिक युवक कुसाजी मेस्त्री, आकाश निकम, वल्लभ राऊळ आणि सोमा मेस्त्री यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्वप्निलला उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निलच्या पायाला मुका मार लागल्याने सूज आली आहे, परंतु त्याची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील गणू राऊळ यांनी तातडीने वन विभागाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वप्निलच्या घरी भेट देऊन पाहणी केली, परंतु कोणतीही आर्थिक मदत दिली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दिवसाढवळ्या गवा रेड्याचा गावात वावर वाढल्याने शिरशिंगे आणि आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही अनेकवेळा गव्याचे दर्शन झाले असून, आता थेट हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये अधिक चिंता निर्माण झाली आहे.
या गंभीर घटनेची दखल घेऊन संबंधित वन विभागाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी गावचे सरपंच दीपक राऊळ आणि पोलीस पाटील गणू राऊळ यांनी केली आहे.
त्यांनी सांगितले की, गव्यांच्या वावरामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, वन विभागाने यावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे.
दिवसाढवळ्या गवा रेड्याच्या हल्ल्याच्या या घटनेमुळे शिरशिंगे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभाग यावर काय उपाययोजना करते, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.












