डझनाला शंभर ते दीडशे रूपये दर, आवक कमी, मागणी वाढल्याचा परिणाम
खेड(प्रतिनिधी)गेल्या एक-दोन महिन्यांपासून खेडमध्ये उष्णता वाढल्याने थंडपेयांबरोबरच लिंबू सरबताची मागणीही वाढत चालली आहे. नागरिकांसह रसवंती आणि सरबत दुकान व्यावसायिकांकडून लिंबांची जास्त खरेदी होऊ लागल्याने कडाक्याच्या उन्हात लिंबूचे दरही ‘कडक’ झाले आहेत. साईजनुसार डझनाला शंभर ते दीडशे रुपयांनी विक्री होत आहे. आवक कमी आणि मागणी वाढल्यामुळेच चढ्या दराने लिंबू खरेदी करण्याची वेळ. ग्राहकांवर येऊन ठेपली आहे.
लिंबूपाणी, लिंबू सरबत, ऊसाच्या रससह शाकाहारी व मांसाहारी जेवणातही लिंबाचा वापर केला जात आहे. वाढत्या उष्प्यामुळे ग्राहकांची लिंबाच्या सरबताची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यापूर्वी शेकडा ४०० ते ५०० रुपयांनी विकला जाणारा लिंबू आतां ५००
ते ८०० रुपयांनी विकला जात आहे. जानेवारी महिन्यात लिंबू खरेदीसाठी ग्राहकांना डझनाला अवघे ५० ते ६० रूपये मोजावे लागत होते. फेब्रुवारीपासून त्यात महागाईचा तडका बसून शंभर ते दीडशे रुपये डझनाने खरेदी करावा लागत आहे. किरकोळ बाजारात सद्यस्थितीत मोठा लिंबू एक नग १० रुपये व लहान ५ रुपयांनी विकत घ्यावा लागत आहे. ग्राहकांनी डझन लिंबू घेतल्यास त्यावर एखाददुसरा जादा लिंबू देवून त्यांचे समाधान करण्याचे कामही विक्रेत्यांकडून केले जात आहे.
येथे येणारा लिंबू पंढरपूर व बिजापुरातून येत असून आठवड्यातून दोन गाड्यांतून प्रत्येकी अडीच टन लिंबू येत आहे. ही आवक आणखी वाढण्याची गरज आहे. मात्र, पाणीटंचाईमुळे घाटमाथ्यावर लिंबू पिकाचे उत्पादन कमी होत आहे.











