मालवण पंचायत समिती परिसर ‘चकाचक’

स्वच्छता मोहिमेत अधिकारी कर्मचारी एकवटले

अमित खोत | मालवण : शासकीय कार्यालय स्वच्छता मोहीम अंतर्गत मालवण पंचायत समिती परिसर चकाचक करण्यात आला. गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या नेतृत्वात सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली.

सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकार्‍यांना कृती कार्यक्रम निश्‍चित करुन दिला. राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या.

आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत. शासकीय कार्यालयात येणार्‍या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्रि्चत करा. अधिकार्‍यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (ईज ऑफ लिव्हिंग) व्हावे यासाठी किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करा. अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या नुसार कार्यवाही सुरु आहे. मालवण पंचायत समितीही सर्व बाबतीत कार्यवाही करतं आहे. मंगळवारी प्रभाविपणे स्वच्छता मोहीम ही राबवण्यात आली. यामोहिमेत पंचायत समिती, जिप बांधकाम, शिक्षण विभाग, सर्वशिक्षा, लघुपाटबंधारे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प असे सर्व विभाग अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.