भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी भरला उमेदवारी अर्ज

नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांचेही अर्ज सादर

भाजपकडून विजयाचा विश्वास : मान्यवरांची उपस्थिती

​सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासह एकूण १५ उमेदवारांनी रविवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. उर्वरित सहा जणांचे उमेदवारी अर्ज उद्या सोमवारी दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती भाजपकडून देण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धा सावंत भोसले, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, सौ. वेदिका परब, ॲड. अनिल निरवडेकर, मनोज नाईक, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक राजू बेग, उदय नाईक, दिलीप भालेकर, अमेय पै, मेघना राऊळ, वेदिका सावंत, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भाजपकडून विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.

​पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत असून सावंतवाडीचा विकास आणि शहराचा कायापालट नजरेसमोर ठेवून आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. शहरात असलेल्या समस्या सोडविण्यासाठी भाजपची सत्ता असणं आवश्यक आहे, असे भाजपकडून सांगण्यात आले.

‘सुंदरवाडीचा सर्वांगीण विकास ‘ आणि महिलांच्या सुरक्षेवर भर –
श्रद्धा सावंत -भोंसले
​नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धा सावंतभोसले यांनी श्री देव पाटेकर आणि उपरलकर देवाचा आशीर्वाद घेऊन अर्ज दाखल केल्याचे सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, ना. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे स्पष्ट केले.

​श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या, “आम्हाला सावंतवाडी विकसित करायची आहे. सावंतवाडीला ‘सुंदरवाडी’ करायची आहे. महिलांसाठी सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि रोजगार निर्मितीवर माझा विशेष भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शहर मंडल अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, राजू बेग, आनंद नेवगी, ॲड. अनिल निरवडेकर, प्रतिक बांदेकर, दिपाली भालेकर, सुनिता पेडणेकर, उदय नाईक, मेघना राऊळ, मोहिनी मडगावकर, दुराली रांगणेकर, समृद्धी विर्नोडकर, सुकन्या टोपले, वेदिका सावंत यांनी उमेदवारी दाखल केले.