राजापूर आगारातील नवीन चार गाडयांसह चालक वाहकही राजापूर आगाराचे
राजापूर आगाराचे शेडयुलवर परिणाम व प्रवाशांचीही होयेत गैरसोय
राजापूर l प्रतिनिधी : रत्नागिरी व चिपळूण आगाराकडून चालविल्या जाणाऱ्या जैतापूर बोरिवली व पावस बोरिवली या दोन गाडयांचे शेडयुल राजापूर आगाराच्या माथी मारत एस. टी. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजापूरातील प्रवाशांची मात्र गैरसोय केली आहे. राजापूर आगाराला नवीन पाच गाडया उपलब्ध झाल्या मात्र यातील चार गाडया व राजापूर आगारचेच चालक वाहक या नव्याने सुरू करण्यात आलेल्या जैतापूर बोरिवली व पावस बोरिवली या फेऱ्यांसाठी वापरण्यात येत असल्याने याचा परिणाम राजापूर आगारातील प्रवाशी सेवेवर होत आहे. तर राजापूर आगारातील पुणे, बोरिवली, सोलापूरसह अन्य लांबा पल्ल्याच्या मार्गावर अशा प्रकारे नवीन गाडयांची मागणी असतानाही प्रवाशांना आहे त्याच जुन्या गाडयांतुनच प्रवास करावा लागत आहे.
तर या दोन्ही गाडयांचे शेडयुल हे रत्नागिरी व चिपळूण आगाराचे असतानाही ते राजापूर आगाराच्या माथी मारत चालक व वाहकही राजापूर आगाराचेच वापरले जात असल्याने राजापूर आगारातील नियमित शेडयुलसाठी गाडयांबरोबरच चालक वाहकांची उणीव भासत आहे. तरी या प्रकरणी आमदार किरण सामंत यांनी लक्ष घालावे अशी मागणी प्रवाशांतुन होत आहे.
रत्नागिरी आगारातुन यापुर्वी पासून रत्नागिरी पावस बोरिवली ही गाडी चालविली जात होती. तर चिपळूण आगाराकडून चिपळुण रत्नागिरी जैतापूर ही बोरिवली गाडी चालवि जात होती. आता या दोन्ही गाडयांचे शेडयुल हे राजापूर आगाराच्या माथी मारण्यात आले आहे. यातुन प्रवाशांना सेवा मिळणार आहे यात कोणाचीही तक्रार नाही. मात्र मुळातच राजापूर आगारात असलेली गाडयांची तसेच चालक वाहकांची कमतरता विचारात घेता याचा परिणाम आता राजापूर आगाराच्या दैनंदिन प्रवाशी सेवेवर होऊ लागला आहे.
राजापूर आगारात मुळात गाडयांची संख्या ही कमी आहे. त्यात परिवहन विभागाने दहा गाडयांची मागणी असताना प्रारंभी पाच गाडया राजापूर आगाराला दिल्या आहेत. त्यामुळे या गाडया राजापूर पुणे, राजापूर बोरिवली, राजापूर सोलापूर अशा लांब पल्ल्याच्या मार्गावर वापरल्या जातील अशी प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र तसे न होता रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी नव्याने आलेल्या पाच पैकी चार गाडया या जैतापूर बोरिवली व पावस बोरिवली यासाठी वापरण्याचे आदेश देत या चार गाडया तीकडे वळविण्यात आल्या आहेत. तर या मार्गावर चालक वाहकही राजापूर आगाराचेच देण्यात आले आहेत. नवीन गाडयी पैकी उरलेली एक गाडी राजापूर सांगली मार्गावर धावत आहे. मात्र पुणे, बोरिवली, सोलापूर मार्गावर जुन्याच गाडया धावत आहेत.
राजापूर आगारातुन राजापूर जैतापूर बोरिवली भाईंदर ही गाडी राजापुरातुन दुपारी ३. १५ वाजता सुटत आहे. तर राजापूर पावस बोरिवली ही गाडी सांयकाळी ४.३० वाजता सुटत आहे.
जैतापूर बोरिवली व पावस बोरिवली या दोन्ही गाडया या रत्नागिरी व चिपळूण आगाराकडून चालविल्या जात असताना त्या राजापूर आगाराच्या माथी मारण्याचे नेमके कारण काय असा सवाल आता प्रवाशांतुन उपस्थित केला जात आहे. रत्नागिरीतील प्रवाशांची सोय पहाताना राजापूरातील प्रवाशांची गैरसोय का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजापूर बोरीवली मार्गावर साध्या गाडीची मागणी असताना स्लीपर कोच बस चालविली जात आहे. त्याचा नाहक आर्थिक भुर्दंड प्रवाशांनाही बसत आहे. या मार्गावर अशा प्रकारे नवीन गाडी द्यावी अशीही प्रवाशांची मागणी आहे. तर राजापूर पुणे मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असून या मार्गावरही नवीन गाडया द्याव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे.











