सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुमती पाध्ये यांचे निधन

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील खिणगिणी येथील सामाजिक कार्यकर्त्या व समाजवादी नेते कै. श्रीराम पाध्ये यांच्या पत्नी श्रीमती सुमती श्रीराम पाध्ये (८९) यांचे शनिवार दि. ५ एप्रिल रोजी वृध्दापकालाने निधन झाले.

राजापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष विजय पाध्ये व राजापूर नगर वाचनालयाचे अध्यक्ष प्रभात पाध्ये यांच्या त्या मातोश्री होत.

सुमती पाध्ये या एक परोपकारी व्यक्तीमत्व म्हणून या परिसरात परिचित होत्या. समाजवादी विचारसरणीचा पगडा असलेल्या श्रीमती पाध्ये यांचा गावातील सामाजिक व शैक्षणिक कार्यात कायमच सक्रीय सहभाग असे. अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला. पती कै. श्रीराम पाध्ये हे समाजवादी पक्षाचे नेते होते. त्यांना त्यांनी कायमच भक्कमपणे साथ दिली. त्या काळात कै. बॅ. नाथ पै. कै. मधु दंडवडते, कै. प्रमीलाताई दंडवते यांसह अनेक समाजवादी नेत्यांची पाध्ये यांच्या घरी उठबस असे. त्यांचे आदरतिथ्यही श्रीमती पाध्ये आदराने करत असत. पतीच्या राजिकय प्रवासात त्यांनी भक्कपणे साथ दिली. तर पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या मुलांनाही त्यांच्या राजकिय, सामाजिक कार्यात व व्यवसायत भक्कम साथ दिली. एक शांत, संयमी व्यक्तीमत्व अशीही त्यांची ओळख होती.

गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र उपचारांना साथ मिळत नव्हती व त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात विजय व प्रभात हे दोन मुलगे, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर खिणखिणी गावातील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.