कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल ; ११ जणांवर गुन्हा दाखल
कणकवली : रस्त्याच्या वादावरून कणकवली तालुक्यातील दारूम येथे दोन गट एकमेकाना भिडले. शिवीगाळ करत मारहाण देखील यावेळी झाली. ही घटना गुरुवारी सकाळी ८:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार नोंद झाली असून एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भास्कर हरिश्चंद्र वाडेकर यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आपल्या मालकीची दारुम माळवतेवाडी येथे जमीन आहे. त्या जमिनीतून राजेंद्र तळेकर यांच्या मधलीवाडी येथील घराजवळ कच्चा रस्ता जातो. आमच्या जमिनीची मोजणी करून दगडी कुंपण घालण्याचे काम सुरू होते. त्या जमिनीच्या एका बाजूने रस्ता दिला आहे. तो तळेकर यांना मान्य नाही.त्यामुळे सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास मुग्धा राजेंद्र तळेकर (४४) या हातात लाकडी बॅट घेवून तिथे आल्या. तसेच दगडी कुंपणाचे काम बंद करा, असे सांगितले. तसेच गवंडी काम करणारे अनंत पांचाळ यांच्या पायावर बॅट मारली. तसेच अशोक तळेकर यांच्याही पायावर, खांद्यावर बॅट मारून दुखापत केली.त्यानंतर राजेंद्र तळेकर (५०), गौरांग तळेकर (२४), निमिषा तळेकर (२०),पूजा तळेकर (२२), नेहा तळेकर (५०), नितीन तळेकर (५७) सर्व राहणार दारोम, मधलीवाडी हे लोखंडी शिग, दांडे, दगड घेवून तिथे आले. त्यांनी आम्हाला शिवीगाळ करत मारहाण केली, असे म्हटले आहे.
तर याप्रकरणी मुग्धा तळेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दारुम येथील त्या कच्चा रस्त्याने गेली २० वर्षे आम्ही ये-जा करतो. तिथे भास्कर वाडेकर पक्का गडगा घालत आहेत. त्यामुळे आमचा रस्ता बंद होणार आहे. आमची वहिवाट त्या जागेत असल्याने तहसीलदारांकडे दावा दाखल केला आहे. त्याची सुनावणी १५ मे रोजी आहे. माझे दिर आजारी असल्याने त्यांना औषधोपचारासाठी न्यावे लागते. त्यामुळे तहसिलदारांकडील त्या सुनावणीपर्यंत दगडी कुंपण घालू नये, असे सांगायला मी गेले असता भास्कर वाडेकर, अनंत पांचाळ, अशोक तळेकर यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच लाकडी दांड्याने मारहाण केली. माझ्या गळ्यातील मंगळसूत्र व चेन त्यावेळी तुटले. संजय तळेकर यांनी ती चेन लंपास केली असे म्हटले आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.











