अमली पदार्थ विक्रीप्रकरणात पोलिसांनी गुन्हेगारांचे आवळले फास

रत्नागिरी : 
जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री पूर्णपणे बंद व्हावी यासाठी पकडलेल्या आरोपींवर पोलीस यंत्रणेने फांस आवळण्यास सुरुवात केली आहे.  प्रांताधिकार्‍यांकडे पोलिसांकडून पाठवण्यात आलेल्या नऊ आरोपींपैकी सहाजणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा निर्णय देण्यात आला आहे. दोघांची सुनावणी प्रलंबित आहे. 11 एप्रिल रोजी हद्दपार केलेल्या तिघांपैकी एकजण अंमली पदार्थ विक्री प्रकरणात तर दोनजण अन्य गुन्ह्यांमध्ये हद्दपार करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रत्नागिरीतील अमेय मसुरकर, रिहाना उर्फ रिजवाना गफार पकाली  हे दोघे अंमलीपदार्थ प्रकरणातील आरोपी नसून, हेमंत भास्कर पाटील मात्र अंमलीपदार्थ विक्री करताना मिळून आलेला होता.
जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी जोरदार मोहीम राबवण्यात येत असून, यात विक्री करणार्‍या आणि विकत घेणार्‍या दोघांवरही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. त्यामुळे अंमली पदार्थ प्रकरणासह नागरिकांना किंवा सार्वजनिक हिताला तापदायक ठरणार्‍यांनाही हद्दपारीचे प्रस्ताव पोलिसांकडून प्रांताधिकार्‍यांकडे पाठवण्यात आले होते. यात तिघांना आधीच जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा निर्णय प्रांताधिकार्‍यांकडून देण्यात आला आहे.
त्यानंतर 11 एप्रिल रोजी आणखी तिघांना प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी रत्नागिरीसह पाच जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. यात अन्य विविध गुन्हे दाखल असणारे अमेय मसुरकर जयस्तंभ आणि रिहाना उर्फ रिजवाना गफार पकाली राजिवडा यांच्यासह अंमलीपदार्थ विक्री प्रकरणात हेमंत भास्कर पाटील याला हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकार्‍यांनी दिले आहेत. अंमलीपदार्थ विक्री प्रकरणात आणखी दोघांचे प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे असून, यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.