खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवरील प्रवास पावसाळ्यात पुन्हा एकदा खडतर होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रशासनाकडून होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अंतर्गत रस्ते अत्यंत खराब आहेत.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत. अनेकदा येथील इंडस्ट्रियल असोसिएशन व प्रसारमाध्यमांनी यावर अनेकदा प्रकाश टाकला आहे. खेड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. एवढेच नाही तर असोसिएशनने उपोषणाचाही इशारा दिला होता. यावर समजूत म्हणून काही ठिकाणी मलमपट्टी करून रस्त्यांना ठिगळ लावण्यात आले. मात्र, पावसाळा जवळ आला तरी ती समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कोणतेच प्रयत्न होत नसल्याचे दिसते.
सध्या वसाहतीत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम दिवसरात्र सुरु आहे. या कामामुळेही रस्त्यावर वाहने चालविणे जिकरीचे होत आहे. याचबरोबर मागील पावसाळ्यात एस.आर. डुग्स कंपनी शेजारील रस्त्याचे काम कमालीचे निकृष्ट झाल्याने महामार्गावरून आत येताना अवजड वाहनेच काय, दुचाकी सुद्धा चालविणे जीवघेणे ठरत आहे. काम निकृष्ट असूनही ठेकेदारावर महामंडळाची एवढी कृपा का, असा प्रश्न लोक करत आहेत.










