सावंतवाडीत मोबाईल टॉवरवरील जनरेटरमधून डिझेल चोरी

तक्रारीनंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल

सावंतवाडी । प्रतिनिधी : तालुक्यातील न्हावेली, सोनुर्ली, माडखोल आणि कुणकेरी येथील खाजगी मोबाईल कंपनीच्या टॉवरवरील जनरेटरमधून डिझेल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात महादेव गुरुनाथ पालकर (रा. कुडाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीत एकूण ३२ हजार ५६२ रुपयांचे डिझेल चोरीला गेले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महादेव पालकर याने न्हावेली येथील टॉवर जनरेटरमधून ७० लिटर (₹६४३९), सोनुर्ली येथील जनरेटरमधून १११ लिटर (₹१०,२१०), माडखोल येथील जनरेटरमधून ६८ लिटर (₹६,२५५) आणि कुणकेरी येथील जनरेटरमधून १०५ लिटर (₹९,६५८) असे एकूण ३२ हजार ५६२ रुपयांचे डिझेल चोरून नेले. याबाबत कंपनीचे रामचंद्र परब यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ही डिझेल चोरी गेल्या महिन्यात झाली असून, जनरेटर बंद पडावेत, कंपनीला त्रास व नुकसान व्हावे या उद्देशाने संशयिताने हे कृत्य केले आहे.

सावंतवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.