खेड मधील दोन एसटी चालकांचे तीन महिन्यांसाठी निलंबन

खेड बसस्थानकातील धिंगाणा भोवला : दारूच्या नशेत केली होती हाणामारी

खेड(प्रतिनिधी) दारूच्या नशेत किरकोळ कारणावरुन येथील बसस्थानकात धिंगाणा घालणाऱ्या आर.डी. आरदवाड, एच. व्ही. भाबड या दोन बसचालकांवर एसटी प्रशासनाने बुधवारी ३ महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिली. गेल्या दीड महिन्यातील बसचालकांच्यानिलंबनाची ही तिसरी घटना आहे.

मंगळवारी रात्री मद्यप्राशन केलेल्या दोन एसटी कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या बाचाबाचीची परिणीती हाणामारीत झाली होती. यामध्ये त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली होती. याचा व्हिडीओ बसस्थानकातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. धूमस्टाईल हाणामारी पाहण्यासाठी जमलेल्या प्रवाशांनी मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
केला होता.

याची एसटी प्रशासनाने गंभीर दखल घेत दोन्ही चालकांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला. २० दिवसांपूर्वीच मद्यप्राशन करुन बस चालवत असताना सवणसनजीक अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक मंगेश आहाके यांच्यावर ३ महिन्यांच्या निलंबनाची कारवाई केली होती. गतमहिन्यातही एका चालकास निलंबित केले होते.