लोटेत कर्ज वसुलीच्या बहाण्याने महिलेला पाच लाखांचा गंडा?

crime fraud

खेड(प्रतिनिधी) ‘तुझ्या नवऱ्याने घेतलेले कर्ज परतफेड कर, नाही तर तुझ्या नवऱ्याला ठार करू’, अशी धमकी देत चारचाकी वाहनातून आलेल्या टोळक्याने एका परप्रांतीय महिलेकडून पाच लाख रुपये घेऊन पोबारा केल्याच्या घटनेची लोटे आणि परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एक परप्रांतीय कुटुंब आपल्या मुलांसह लोटे पंचक्रोशीत एका गावात गेली दहा-बारा वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यातील कुटुंबप्रमुख एका कंपनीत ठेकेदारी तत्त्वावर नोकरी करत आहे. मागील अनेक वर्षांपासून इथे नोकरी करून आपल्यासाठी व पत्नीसाठी त्याने दागदागिनेही बनवून ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी काही अज्ञात लोक त्यांच्या घरी गेले. ‘तुझ्या नवऱ्याने घेतलेले कर्ज परतफेड कर, नाही तर त्याला ठार करू’, अशी धमकी देत या टोळक्याने पैशाची व्यवस्था करण्यास सांगितले.

पीडित कुटुंबाने पोलिसांशी संपर्क साधला असल्याचे समजते. मात्र, अजून त्यांनी तक्रार केलेली दाखल नाही. आपल्या पतीच्या जिवाला धोका असल्याचे लक्षात घेऊन त्या महिलेने परिसरातीलच एका खासगी पतसंस्थेत आपले दागिने तारण ठेवून ‘त्या’ लोकांना पाच लाख रुपये दिले. ही रक्कम तिने सलग तीन दिवस वेगवेगळे दागिने तारण ठेवून त्यांना दिली. मात्र, मंगळवारी ही बाब तिच्या पतीच्या कानावर गेली आणि त्याला धक्काच बसला. यावर त्याने त्या संबंधित पतसंस्थेत विचारणा केली व पत्नीने कुणाला पैसे दिले याचा मागोवा घेण्यासाठी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, पत्नीच्या म्हणण्यानुसार ते टोळके महामार्गावर थांबले होते. महामार्ग या सीसीटीव्हीच्या कक्षेत येत नसल्याने या टोळक्याची माहिती मिळालेली नाही.