रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, खेड आणि मंडणगड येथे नवीन बाजार समित्यांना मंजुरी – शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दापोली l प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली- खेड- मंडणगड मतदारसंघ हा आंबा, काजू, सुपारी, नारळ, कोकम व मासळी यांसारख्या शेती व मत्स्य उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, स्थानिक बाजारपेठेचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आपली उत्पादने विक्रीसाठी जवळपास १५० ते २०० किमी अंतरावरील रत्नागिरी येथील बाजार समितीकडे जावे लागत होते. परिणामी वाहतूक खर्च, वेळ व श्रम यांचा मोठा बोजा शेतकऱ्यांवर पडत होता.

 

या पार्श्वभूमीवर, राज्याचे राज्यमंत्री मा. श्री. योगेश कदम यांनी दापोली, खेड आणि मंडणगड या तीनही तालुक्यांमध्ये स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापण्याची मागणी सातत्याने केली. आता मा. मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत प्रत्येक तालुकास्तरावर नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याअंतर्गत खेड, मंडणगड आणि दापोली येथे नव्या बाजार समित्यांना मंजुरी मिळाली आहे.

 

या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरच उत्पादने विक्रीसाठी संधी उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळणार आहे. वाहतूक खर्च आणि वेळेची बचत होऊन स्थानिक आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळेल. परिणामी, शेतकऱ्यांचे उत्पन्नही निश्चितपणे वाढीस लागेल.

 

या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांनी सातत्याने पाठपुरावा करत शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावी भूमिका बजावली आहे.