आमदार निलेश राणे यांच्या मागणीची पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून तात्काळ दखल

मामासाहेब वरेरकर नाट्यगृह दुरुस्ती व नूतनीकरण प्रस्ताव सादर करण्याच्या जिल्हा प्रशासनास सूचना

नाट्यगृह सुसज्ज करून नाटक आणि सिनेमा अश्या दुहेरी हेतुसाठी वापर होणार

दहा कोटी निधी लागल्यास तोही देऊ : मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे घोषणा

अमित खोत | मालवण : मालवण येथील मामासाहेब वरेरकर नाट्यगृहाची दुरुस्ती व नूतनीकरण करून नाट्यगृहाचा वापर नाटक आणि सिनेमा या दुहेरी हेतुसाठी व्हावा. याबाबतचा सर्व समावेशक प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा. याबाबतचे पत्र महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने जिल्हाधिकारी व मालवण नगरपरिषद यांना पाठवण्यात आले आहे.

मामा वरेरकर नाट्यगृहाच्या दुरुस्ती व सुविधांसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार मागील आठवड्यात मालवण दौऱ्यावर आले असताना त्यांच्याकडे केली होती. दरम्यान, मंत्री आशिष शेलार यांनी आमदार निलेश राणे यांची मागणी तात्काळ मान्य करताना मामा वरेरकर नाट्यगृह अद्ययावत केले जाईल असे जाहीर केले. सर्व सुविधा, तसेच नाट्यगृहात सिनेमागृह ही केले जाईल. यासाठी दहा कोटी रूपये निधी लागल्यास तोही देऊ. असे मंत्री शेलार यांनी सांगितले होते. त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग यांनी सर्व समावेशक प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा असे पत्र पाठवले आहे.

मालवण नगरपरिषदेच्या मामासाहेब वरेरकर नाट्यगृहाची दुरुस्ती व नुतनीकरणाबाबत आमदार निलेश राणे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे लक्ष वेधल्या नंतर मंत्री आशिष शेलार यांनी मामासाहेब वरेरकर नाट्यगृहाची पाहणी केली असता नाट्यगृहात मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्या आहेत. सदर नाट्यगृहाच्या दुरुस्ती व आधुनिकिकरण यासाठी आतापर्यंतच्या निधी उपलब्धतेचा स्रोत कृपया शासनास अवगत करावा. तसेच, सदर नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठीचा आणि नाट्यगृहाचा वापर नाटक आणि सिनेमा या दुहेरी हेतु बाबतचा सर्व समावेशक प्रस्ताव आपल्या अभिप्रायासह शासनास सादर करण्यात यावा. असे पत्र महाराष्ट्र शासन कार्यसन अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांनी पाठवले आहे. त्यामुळे शासन स्तरावरून लवकरच निधी उपलब्ध होऊन एक आधुनिक सोई सुविधानसह सुसज्ज नाट्यगृह जनतेच्या सेवेत असेल.