खुल्या गटातील ५०० मीटर सागरी जलतरण स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक
संतोष कोत्रे l लांजा -: विजयदुर्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे झालेल्या खुल्या गटातील ५०० मीटर सागरी जलतरण स्पर्धेत लांजा तालुक्यातील आरगावचा सुपुत्र असलेल्या रेयांश दीपक खामकर या सात वर्षीय जलतरणपटूने चमकदार कामगिरी करताना सुवर्णपदक पटकावले आहे .
लांजा तालुक्यातील आरगाव चा सुपुत्र आणि आरगावचे सामाजिक कार्यकर्ते असलेल्या चंद्रकांतदादा श्रीधर खामकर यांचा नातू असलेला सात वर्षीय रेयांश दीपक खामकर हा सध्या
ठाणे येथे राहत असून सरस्वती मंदिर ट्रस्ट इंग्रजी माध्यमातून दुसरीच्या वर्गात शिकत आहे. मारोतराव शिंदे तरण तलाव (ठाणे महानगर पालिका संचालित )स्टार फिश foudation स्विमिंग क्लब येथे कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचा सराव करीत आहे. जलतरण मधील असलेल्या त्याच्या चमकदार कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतलेली आहे.
दिनांक २० एप्रिल रोजी विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) येथे झालेल्या खुल्या गटातील ५०० मीटर सागरी जलतरण स्पर्धेत सात वर्षीय रेयांशने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करून अतिशय रोमहर्षक रीतीने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. सात वर्षीय बाल जलतरणपटू रेयांश याने खुल्या गटात वयाने ब-याच मोठ्या असलेल्या जलतरणपटूंशी स्पर्धा करुन प्राप्त केलेल्या या सुवर्णपदकाचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या बाल जलतरणपटू रेयांश खामकर याचे सर्व थरातून कौतुक होत आहे. त्याच्या या सुवर्णमय कामगिरीबद्दल आरगावातून देखील जल्लोष करण्यात आला. रेयांश च्या या यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते असलेल्या आजोबा चंद्रकांतदादा श्रीधर खामकर यांनी देखील आनंद व्यक्त करताना रेयांश याने आपल्या कामगिरीने आरगावसह तालुक्याचे नाव रोशन केले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.











