जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे
लांजा (, प्रतिनिधी) -: या ठिकाणी सुसज्ज अशा रुग्णालयाचा अभाव आहे, आणि म्हणूनच लांजा- रत्नागिरी येथील रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूर किंवा मुंबईला जायला लागू नये, त्यांना याच ठिकाणी उपचार मिळाले पाहिजेत या दृष्टीने लवकरच या ठिकाणी सुसज्ज असे रुग्णालय उभे करण्याचा मनोदय जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी लांजा येथे व्यक्त केला.
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने लांजा येथे सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन त्याचप्रमाणे निलेश सांबरे यांचा वाढदिवस असा संयुक्त कार्यक्रम आज बुधवारी लांजा येथे पार पडला यावेळी निलेश सांबरे हे बोलत होते .
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने लांजा येथे कार्यालया सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी महिला, तरुणवर्ग मुली, यांच्यासाठी विविध कोर्सेस मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सापुचेतळे येथे मोफत पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्यात आलेले आहे. लांजा येथील कार्यालयाचे उद्घाटनच्या निमित्ताने जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असलेले निलेश सांबरे हे प्रथमच आज बुधवारी २३ एप्रिल रोजी लांजा येथे आले होते. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महिलांकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाला महिला वर्गाची उपस्थिती ही प्रचंड मोठी होती .
यावेळी बोलताना निलेश सांबरे म्हणाले की गेल्या १६-१७ वर्षापासून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण काम करत आहोत. ते म्हणाले की आपला कोकणी माणूस जो सर्वच दृष्टीने आर्थिक सामाजिक राजकीय पुढे गेला आहे तो आपल्या समाजाला पुढे नेत नाही ही खंत आहे .आणि म्हणूनच तुम्हा आम्हाला आपल्या प्रत्येक माणसाला पुढे घेऊन जायचे आहे..आपण ज्या पद्धतीने राहतो, सुख सोयी अनुभवतो त्या प्रत्येक सुखा सोयींचा लाभ देखील तुम्हाला मिळाला पाहिजे असा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर कोकणचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.
शिक्षणाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणूनच आपण चांगले शिक्षण घेतले पाहिजे. आपल्या मुलांनी देखील चांगले शिक्षण घेतले पाहिजे आपल्या या कोकणातून दरवर्षी किमान २५ विद्यार्थी हे जिल्हाधिकारी, २५ विद्यार्थी एसपी, सीए झाले पाहिजेत. व्यावसायिक झाले पाहिजेत. त्यासाठी मुलांना शिक्षण द्या. मुलांना स्वप्न दाखवा. त्यांना शैक्षणिक दृष्टिकोन ठेवा तर निश्चितच भविष्यात या कोकणाला सोनेरी दिवस येतील .
ते पुढे म्हणाले की मी जिल्ह्यात फिरत असताना पाहिले आहे या ठिकाणी सुसज्ज रुग्णालयाचा अभाव आहे .त्यामुळे येथील गोरगरीब रुग्णांसह सर्व रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूर किंवा मुंबई येथे धाव घ्यावी लागते. आपल्याला हे सारे चित्र बदलायचे आहे. आपल्या लांजा रत्नागिरी येथील लोकांना याच ठिकाणी कोल्हापूर, मुंबई दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी, या दृष्टीने मी अशी व्यवस्था करणार आहे. लवकरच या ठिकाणी या दृष्टीने सुसज्ज असे रुग्णालय उभे करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिला वर्गाकडून भला मोठा केक कापून निलेश सांबरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. या सर्व महिला वर्ग, विद्यार्थ्यांकडून निलेश सांबरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जिजाऊ संस्थेचे लांजा तालुका प्रमुख योगेश पांचाळ, सर्व पदाधिकारी व महिलावर्ग यांनी मेहनत घेतली











