राजापूर l प्रतिनिधी : घराजवळच तीव्र उतारावर ट्रक्टर पलटी झाल्याने त्या ट्रक्टरखाली चिरडून ट्रक्टर चालक जागीच ठार झाल्याची घटना शुकवारी सकाळी शहरातील वरचीपेठ येथे घडली. प्रमोद पांडुरंग मांजरेकर (51) असे या अपघातात मृत्युमुखडी पडलेल्या ट्रक्टर चालकाचे नाव आहे. प्रमोद याच्या वरचीपेठ येथील घरासमोरच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने वरचीपेठ परिसरासह राजापूर शहरावर शोककळा पसरली आहे.
शहरातील वरचीपेठ येथील प्रमोद मांजरेकर हे चालक असून शुकवारी सकाळी नेहमीपमाणे त्यांनी आपला ट्रक्टर व्यवसायासाठी जाणेकरिता बाहेर काढला. या ठिकाणी त्यांच्या घराला लागून तीव्र उताराचा रस्ता असून या उतारावर प्रमोद याचा अचानक ट्रक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रक्टर पलटी झाला. यामध्ये प्रमोद हा या ट्रक्टरच्या पुढच्या भागाखाली आला व चिरडला गेला. या घटनेने हादरून गेलेल्या मांजरेकर कुटुंबियांनी आरडा-ओरड केल्यानंतर शेजारी तसेच आजुबाजुच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी घटनास्थळी उपस्थित तरूणांनी प्रमोद याच्या अंगावर पलटी झालेला ट्रक्टर उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. अखेर जेसीबा आणून त्याच्या सहाय्याने ट्रक्टर उचलून बाजुला करून प्रमोद यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पुर्वीच प्रमोद याची प्राणज्योत मालवली होती.
प्रमोद याच्या या अपघाती निधनाची माहिती मिळताच राजापूर ग्रामीण रूग्णालयात मोठी गर्दी झाली होती. एक प्रामाणिक आणि कष्ट करून आपले कुटुंब सांभाळणारा कर्ता पुरूष घरातुन गेल्याने मांजरेकर कुटुंबीयांवर दुखाचा डेंगर कोसळला आहे. प्रमोद याने काही काळ राजापूर नगर परिषदेतही कंत्राटी चालक म्हणून काम केले होते. त्याचा मित्र परिवारही मोठा आहे.
प्रमोद याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, भाऊ असा मोठा परिवार आहे.











