पाकिस्तानच्या ध्वजाचे समर्थन भोवले : हिंदू संघटना आक्रमक 

पाक ‘ धार्जिण्या भाजीविक्रेत्याला चोप 

पोलीसांच्या केले स्वाधीन 

सावंतवाडी : काश्मीरमधील पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सावंतवाडीतील गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी गांधी चौक परिसरात पाकिस्तानचा ध्वज रस्त्यावर ठेवला होता.

आज पहाटे शहरातील एका ‘पाक ‘ धार्जिण्या भाजी विक्रेत्याने रस्त्यावर ठेवलेला पाकिस्तानचा ध्वज उचलून आपल्या दुकानात नेऊन ठेवला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

या घटनेची माहिती हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी तातडीने एकत्र येत त्या भाजी विक्रेत्याला जाब विचारला आणि त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी त्या विक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पुढील कारवाई पोलीस प्रशासन करत आहे.

दरम्यान, भाजी मंडईमध्ये काही मुस्लिम समाजाचे भाजी विक्रेते गावातून येणाऱ्या जेष्ठ महिला भाजी विक्रेत्यांना दादागिरी करत असल्याची तक्रार काही हिंदू बांधवांनी केली. या तक्रारीनंतर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने भाजी मंडई गाठली आणि दादागिरी करणाऱ्या त्या मुस्लिम भाजी विक्रेत्याला जाब विचारला. तसेच, त्याला अनधिकृत जागेवर बसण्यास मनाई केली आणि हिंदू महिला भगिनींना दादागिरी करू नये, असा सज्जड दम भरला. त्यानंतर त्या विक्रेत्याला तेथून उठवण्यात आले.

याचबरोबर, काही भाजी विक्रेते दुकानाची जागा असल्याचे सांगून इतरांची जागा अडवून ठेवून दादागिरी करत असल्याची तक्रारही हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली. यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि अनधिकृतपणे बसलेल्या विक्रेत्यांना हटवण्याची मागणी केली.

या निषेध आंदोलनात आणि त्यानंतर घडलेल्या घटनांच्या वेळी सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री विनायक रांगणेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, कृष्णा धुळापनावर, विश्वास घाग, शुभम हिर्लेकर, लादू रायका, संकल्प धारगळकर, हितेन नाईक, गजानन करमळकर, हेमंत बिरोडकर, सागर गावडे, शिवराज राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते. या घटनांमुळे सावंतवाडी शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.