सोनगावमधील मृत कामगाराच्या कुटुंबाला ५ लाख

खेड(प्रतिनिधी)तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील स्पॅक ऑरगॅनिक कंपनीत प्रदीप विठ्ठल खेराडे (५५, सोनगाव-माठवाडी) या कामगाराच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी प्रवेशद्वारावर ठिय्या ठोकला होता. अखेर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मृत कमगाराच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, येत्या चार दिवसात कंपनी व्यवस्थापनासमवेत बैठक होणार असून कंपनी मालकाशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
 याप्रसंगी राजीव घाग, विजय साळुंखे, सुरेश कारेकर, मिलींद घोरपडे, प्रकाश खेराडे, रवी खेराडे, दत्ताराम गोठल, राकेश नायनाक यांच्यासह २५० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. घरातील कर्त्या पुरूषावर नियतीने झडप घातल्याने खेराडे कुटुंबियांवर संकट कोसळले आहे.