खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील नागरिकांनी आपल्या घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी तात्काळ भरून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन खेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी केले आहे. शहरातील नागरिकांना चांगल्या आणि नियमित सुविधा देण्यासाठी कर वसुली वेळेत होणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खेड शहरासाठी सन्माननीय योगेश दादा यांच्या माध्यमातून तब्बल ४८ कोटी रुपयांची मोठी नळपाणी योजना मंजूर करून आणण्यात आली आहे. ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी काही कालावधी लागणार असला तरी शहरातील नागरिकांना भविष्यात मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. मात्र, शहरात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अनेक नागरिकांनी पाण्याचे बिल तसेच घरपट्टीची थकबाकी भरलेली नसल्याची बाब समोर आली आहे.
नगरपरिषदेला शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, दिवाबत्ती यांसारख्या मूलभूत सुविधा सुरळीतपणे चालवण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोटारी, पंप, लाईट बिल तसेच इतर देखभाल खर्च नियमितपणे करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी वेळेत पाणीपट्टी आणि घरपट्टी भरणे अत्यंत गरजेचे असल्याचेही उपनगराध्यक्ष चिकणे यांनी सांगितले.
खेड शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या शहराच्या विकासासाठी आणि आवश्यक सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने मिळाव्यात यासाठी घरपट्टी व पाणीपट्टी तात्काळ भरून नगरपरिषदेला सहकार्य करावे. नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास शहरातील विकासकामे आणि सुविधा अधिक प्रभावीपणे देणे नगरपरिषदेला शक्य होईल, असेही सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी दै. प्रहारशी बोलताना सांगितले.












